संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेला ‘हे’ प्रसिद्ध वकील कायदेशीर मदत करणार
अमोल शिंदेला महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील असिम सरोदे हे कायदेशीर मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. असिम सरोदे यांनी फेसबूक पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव करून देत सकारात्मक शिक्षा देण्याचं आवाहन असिम सरोदे यांच्याकडून न्यायालयात केले जाणार आहे.
मुंबई, १४ डिसेंबर २०२३ : संसदेची सुरक्षा भेदून दोन तरूणांनी लोकसभेच्या भर कामकाजात घुसखोरी करत उड्या घेतल्या. यामध्ये महाराष्ट्रातील अमोल शिंदे या तरूणाचा समावेश आहे. दरम्यान, या तरूणाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील असिम सरोदे हे कायदेशीर मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. असिम सरोदे यांनी फेसबूक पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव करून देत सकारात्मक शिक्षा देण्याचं आवाहन असिम सरोदे यांच्याकडून न्यायालयात केले जाणार आहे. तर अमोल शिंदेवर लावलेली कलमं चुकीची असल्याने अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार, असल्याचं असिम सरोदे यांनी जाहीर केले आहे. ‘अमोलचा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे.’ असं सरोदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.