Rahul Solapurkar Video : शिवराय, आंबेडकरांवरील वादग्रस्त विधानानंतर माफीनामा, मात्र कारवाईऐवजी राहुल सोलापूरकरला सुरक्षा; कारवाई कधी?
वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरच्या विरोधात संताप वाढत असताना दुसरीकडे त्याच्या घराबाहेरच्या बंदोबस्तामध्ये सुद्धा वाढ होत आहे. विरोधकच नाही तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा सोलापूरकरच्या विरोधात संताप व्यक्त केलाय. मात्र कारवाई कधी होणार हा प्रश्न कायम आहे.
औरंगजेबाची बायको आणि वजीराला लाज देऊन शिवाजी महाराज हे आग्र्यातून सुटले आणि वेदांनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हणच ठरतात, अशा वादग्रस्त वक्तव्यानंतर तीव्र संताप उमटूनही सोलापूरकरविरोधात अद्याप सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. मात्र कारवाई ऐवजी त्याच्या घराबाहेर सात दिवसांपासूनच्या पोलीस बंदोबस्तात अजून वाढ केल्याने विरोधकांनी टीका केली आहे. राहुल सोलापूरकरने स्वतः दिलेल्या माहितीनुसार तो संघाचा स्वयंसेवक आहे. त्यावरून संजय राऊतांनी सरकारवरच निशाणा साधलाय. सर्वत्र रोष उमटल्यानंतर सोलापूरकरने दिलगिरी व्यक्त केली खरी. मात्र आपण चुकीचं बोललो असं म्हणण्याऐवजी त्याने संदर्भ दिले. पण इतिहासाच्या कोणत्या पानावर शिवराय लाच देऊन आग्र्यातून सुटल्याचा उल्लेख आहे हे सोलापूरकर अद्यापही दाखवू शकला नाही. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरही असं वेदांमध्ये म्हटलं आहे असं सांगून दिलगिरी व्यक्त केली.
राज आणि राजपूत्र एकाच पेठाऱ्यात बसून बाहेर पडले, असा उल्लेख शिवरायांचे पुत्र राजाराम महाराजांच्या आज्ञेने लिहिलेल्या गेलेल्या सभासद बखरीमध्ये आहे. त्या रात्री शिवाजी महाराज पेठाऱ्यातून निघून गेले. असा उल्लेख खुद्द औरंगजेब किंवा मुघलांचा इतिहास लिहिणारे भीमसेन सक्सेना यांच्या तारीख ए दिलकशा या ग्रंथात देखील सापडतो. यो वेंकी पटाऱ्या की आमदरफ्त भी सो पटाऱ्या में बैठ निकल्यो… म्हणजे शिवराय पेठाऱ्यांमधून पसार झाल्याची शक्यता आग्र्यामधील समकालीन परकालदास यांनी 3 सप्टेंबर 1666 ला लिहून ठेवली. औरंगजेबाचं अधिकृत चरित्र मानलं जाणाऱ्या आलमगीरनामा यामध्ये देखील शिवराय वेषांतरण करून पसार झाल्याचा उल्लेख आहे. मात्र पेठारे काही नव्हते शिवराय लाच देऊन सुटले आणि आंबेडकर वेदांनुसार ब्राम्हण ठरतात अशा वक्तव्यांनी सोलापूरकर वाद ओढून घेतोय. एकीकडे महापुरूषांबद्दल मनात येईल ते बोलणाऱ्या राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा, असं मत स्वतः सत्ताधारी नेते व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे विरोधक आणि आंदोलक सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा म्हणून त्याच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत आणि तिसरीकडे सोलापूरकरच्या घराबाहेर इतका बंदोबस्त आहे की तिथं पोलीस छावणीच स्वरूप आलंय.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र

'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
