पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी अन् झाला गजाआड, नेमकं प्रकरण काय?
अकोल्यातील पातूर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शहाबाबू उर्दू हायस्कूल येथील केंद्रावर बारावीचे परीक्षा सत्र सुरू झाले आहे. २१ फेब्रुवारी रोजी पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर चक्क रुबाबात कॉपी पुरवायला गेला आणि....
अकोला, २२ फेब्रुवारी २०२४ : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान होत आहे. काल बुधवारपासून परीक्षा सुरू झाली असून १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. मात्र तरी एक धक्कादायक प्रकार अकोल्यातून समोर आला आहे. अकोल्यातील पातूर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शहाबाबू उर्दू हायस्कूल येथील केंद्रावर बारावीचे परीक्षा सत्र सुरू झाले आहे. २१ फेब्रुवारी रोजी पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर चक्क रुबाबात कॉपी पुरवताना तोतया पोलीस हवालदार याला ठाणेदार किशोर शेळके यांनी रंगेहाथ पकडून गजाआड केले. २१ फेब्रुवारी रोजी शहाबाबू हायस्कूलवर बारावीचे परीक्षा सत्र सुरू असताना पातूर पोलीस ताफ्यासह परीक्षा सेंटरवर बंदोबस्तासाठी गेले होते. तेथे अनुपम मदन खंडारे हा पोलिसाचा गणवेश परिधान करून इंग्रजी या विषयाची गाईडमधून कॉपी पुरवताना ठाणेदार किशोर शेळके यांनी त्याला अटक केली.