शंभूराज देसाईंना शिंदेंच्या शिवसेनेकडून तिकीट तर मविआकडून ‘हा’ नेता अपक्ष लढणार? साताऱ्याच्या पाटणमध्ये होणार तिरंगी लढत?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली वहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. शिंदे गट शिवसेनेकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शंभूराज देसाई यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शंभूराज देसाई यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे साताऱ्यातील पाटणमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्व. आनंद दिघेंच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. माझ्यावर विश्वास दाखवून पाटण विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून माझे नाव घोषित केल्याबद्दल एकनाथजी शिंदे व शिवसेना पक्षाचे, महायुतीतील सर्व घटक पक्ष व नेत्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो!’ असे ते म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शरद पवार गट राष्ट्रवादीचे सत्यजीत पाटणकर हे अपक्ष लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीकडून सत्यजीत पाटणकर यांना उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेसाठी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला असून ते विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.