Special Report | संजय राऊतांच्या मध्यस्थीनं पवारांची नाराजी दूर?
शरद पवार नाराज या चर्चेला अर्थ नाही. तिन्ही पक्षांचं व्यवस्थित सुरु असल्याचा दावा राऊत यांनी पुन्हा एकदा केलाय. काल मुख्यमंत्री आणि पवारांच्या भेटीनंतर आज राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या गेल्या दोन-तीन दिवसांत मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्याच्या वाऱ्या पाहायला मिळत आहेत. राऊत यांच्या या फेऱ्यांवरुन शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारच्या कारभारावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या बाबत विचारलं असता शरद पवार नाराज या चर्चेला अर्थ नाही. तिन्ही पक्षांचं व्यवस्थित सुरु असल्याचा दावा राऊत यांनी पुन्हा एकदा केलाय. काल मुख्यमंत्री आणि पवारांच्या भेटीनंतर आज राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार नाराज या चर्चेला अर्थ नाही. तिन्ही पक्षांचं व्यवस्थित सुरु आहे. केव्हातरी पूर्णविराम द्यावा लागेल. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मनुष्य म्हटल्यावर मतभेद असू शकतात पण नाराज कुणीच नाही, असं राऊत यांनी आवर्जुन सांगितलं. अहमदाबादमध्ये कुणालाही भेटल्याचा इन्कार शरद पवार यांनी केलाय. मोदी-ठाकरे यांच्यात चर्चा झाली असली तरी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. या दोन्ही बैठकांमध्ये काहीही राजकारण नसल्याचा दावाही राऊत यांनी यावेळी केलीय.
‘विधानसभा अध्यक्ष महाविकास आघाडीचाच असेल’
विधानसभा अध्यक्षपदाची निवड याच पावसाळी अधिवेशनात व्हावी अशी काँग्रेसची मागणी आहे. त्याबाबत विचारलं असता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. निवडणूक कधीही झाली तर महाविकास आघाडीचाच उमेदवार जिंकेल असा दावा राऊत यांनी केलाय. पण तो उमेदवार काँग्रेसचा असेल का? याबाबत मात्र राऊत काही बोलले नाहीत. इतकंच नाही तर जेव्हा आम्हाला परीक्षा द्यायची तेव्हा देऊ. परीक्षा आणि पेपर सेट झालाय. कुणाचं काय फुटेल ते पहा, अशा शब्दात भाजपच्या सत्ताबदलाच्या दाव्यावर राऊतांनी जोरदार निशाणा साधलाय.
‘भाजपवाले राजा हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?’
अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. त्याबाबत विचारलं असता अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक यांची बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांची कोंडी केली जातेय. भाजपमध्ये काही धुतल्या तांदळाचे आहेत का? राजा हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केलाय. तसंच तिन्ही पक्ष एकत्रित बसून याबाबत पुढील वाटचाल ठरवतील असंही राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या :
मराठा समाज त्यांच्या गाड्यांमागे धावला, त्यांनी समाजाला काय दिलं? चंद्रकांत पाटलांचा पवारांवर घणाघात
संजय राऊत आणि शरद पवार भेट व्हाया उद्धव ठाकरे! राजकीय विश्लेषकांच्या मते गाठीभेटीचं कारण काय?