‘मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा’, शरद पवार गटातील नेत्याचा आक्रमक सवाल
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार गटानं आत्रामांवर टीकास्त्र डागलं आहे. भाग्यश्री आत्राम हलगेकरांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नसल्याचं विधान धर्मरावबाबा आत्राम यांनी केलं होतं. त्यानंतर आता भाग्यश्रीताईंना नदीत फेकायचं, मग दादांना कुठे फेकायचं सांगा? असा सवालच अजित पवार गटाला केलाय.
अजित पवारांचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्याच मुलीला नदीत फेकण्याची भाषा केल्याचे पाहायला मिळाले होते. आत्रामांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याने धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्याच मुलीवर टीका केली होती. दरम्यान त्यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार गटाकडून पलटवार करण्यात येतोय. स्वतःच्या लेकीला नदीत टाकणारे महाराष्ट्रातील लेकींची रक्षा करतील? असा सवाल करत आत्राम यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार गटानं ट्विट करत धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह महायुतीवर शरसंधान साधलंय. तर भाग्यश्री ताईना नदीत फेकायचं, मग अजित पवारांना कुठे फेकायचं हेही सांगा, असं वक्तव्य करत शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी अजित पवार गटाला सवाल केला आहे. ‘अजित पवार यांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलाप्रमाणे सांभाळलं. त्यांनी तीन वेळा उपमुख्यमंत्री केलं. त्याला विरोधी पक्ष नेता केलं. त्याला आमदार केलं, राज्यमंत्री केलं, मंत्री केलं १८ वर्ष सोन्याचा चमचा दिला, मंत्री केलं आणि त्यानेच स्वतःच्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसलं त्यांना कुठे फेकायचं हे पण सांगा’, असं मेहबूब शेख म्हणाले.