विधानसभेला काहीच दिवस शिल्लक अन् युगेंद्र पवारांनी सांगितला शरद पवारांचा कानमंत्र, म्हणाले…
येत्या २० नोव्होंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार असून २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. या निवडणुकीपूर्वी युगेंद्र पवार यांनी आपला प्रचार दौरा सुरू केलाय.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर बारामती विधानसभेची रणनिती नेमकी कशी असणार यासंदर्भात शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जनतेत फिरलोय. त्यानंतर आभार दौरा आणि स्वाभिमान यात्रा काढली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौरे सुरू झालेत. तालुक्यात, जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.’, असं युगेंद्र पवार म्हणाले. पुढे त्यांनी शरद पवारांचा कानमंत्र देखील सांगितला. ‘जास्तीत जास्त लोकांपर्यतं पोहोचा.. ‘, असं शरद पवारांनी सांगितलं त्यातला हा एक प्रयत्न आहे. नुकताच पवार कुटुंबांचा दिवाळी पाडवा साजरा झाला. इतिहासात पहिल्यांदाच पवारांचे दोन पाडवा साजरा झालेत. यावर युगेंद्र पवार म्हणाले, दिवाळी पाडव्याची परंपरा शरद पवारांनी सुरू केली होती. कित्येक दशकांपासून गोविंदबागेत दिवाळी पाडव्याला अनेक कार्यकर्ते शरद पवारांना भेटण्यासाठी येतायत. त्याच पद्धतीने यंदाही दिवाळी पाडव्याची परंपरा शरद पवारांनी कायम ठेवली. तर अजित पवार हे भाऊबीज आणि पाडव्याला गोविंदबागेत गैरहजर होते, यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, अजित पावार गैरहजर होते हा त्यांचा प्रश्न आहे. याबद्दल त्यांनाच थेट विचारलं पाहिजे, असं म्हणत यावर अधिक प्रतिक्रिया देणं टाळल्याचे पाहायला मिळाले.