Sharad Pawar: बापट निवडून कसे येतात अजूनही कळलं नाही; पवार-बापटांची जुगलबंदी रंगली
Sharad Pawar: अंकूश काकडे यांच्या हॅशटॅग या पुस्तकाचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी भाजप खासदार गिरीश बापट (girish bapat) आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकूश काकडे यांच्या मैत्रीवरून जोरदार टोलेबाजी केली. निमित्त होतं अंकूश काकडे (ankush kakde) यांच्या हॅशटॅग या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. यावेळी पवार आणि बापट यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. गिरीश बापट आणि अंकूश काकडे यांची महानगरपालिकेतील मैत्री सर्वांना माहीत आहे. तेव्हा पुण्यातील अनेक जागा आम्ही जिंकल्या होत्या. पण एक गोष्ट माझ्या लक्षात याची नाही की गिरीश बापट जिथे उभे राहतात तिथून निवडून कसे येतात? असा सवाल करतानाच एकदा कसब्यात की कुठे तरी बापट उभे होते. कसब्यात उभे असताना आम्ही ठरवलं की आता काळजी घेऊया बापटांची. पण आम्हाला त्यात काही यश आले नाही. आता मात्र हे पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं. गिरीश, शांतीलाल सुरतवाला आणि अंकूश यांची जी काही गट्टी आहे, त्या गट्टीचा आणि त्यांच्या विजयाचा काही संबंध आहे का? हे तपासण्याची वेळ आली आहे, अशी मिश्किल टोलेबाजी शरद पवारांनी केली. त्यामुळे सभागृहात एकच खसखस पिकली.