शिवसेनेत नेमकी फूट कशामुळे पडली? आनंदराव अडसूळ लवकरच करणार गौप्यस्फोट
मारणाऱ्याचे हात आणि बोलणाऱ्याच तोंड आपण बंद करू शकत नाही, असे का म्हणाले शिंदे गटातील नेते आनंदराव अडसूळ?
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती राज्यभरात साजरी होत आहे. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर असंख्य शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. अशातच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिंदे गटातील नेते आनंदराव अडसूळ हे देखील अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झाले होते.
बाळासाहेब ठाकरे हे श्रद्धास्थान आहेत. म्हणून आज आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करत आहोत. त्यामुळे कोणत्याही गटाचा इथे प्रश्न नाही, अशी प्रतिक्रिया आनंदराव अडसूळ यांनी दिली. उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने गद्दार असा उल्लेख केला जात आहे, यावर बोलताना आनंदराव अडसूळ म्हणाले, मारणाऱ्याचे हात आणि बोलणाऱ्याच तोंड आपण बंद करू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.