अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत काय केला दावा?
'आमदार सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या सकाळी ९ वाजता सर्वांनी शाखा क्रमाकं १९४ सामना प्रेस प्रभादेवी येथे उपस्थित रहावे', असे सदा सरवणकर यांच्या मुलाकडून स्टेटस ठेवण्यात आलंय. त्यामुळे सरवणकर माहिममधून माघार घेणार नसल्याचे चित्र दिसतेय.
माहिम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी बिग फाईट पाहायला मिळणार आहे. माहिम मतदारसंघातून मनसेकडून अमित ठाकरे, ठाकरे गटाकडून महेश सावंत तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे माहिम मतदारसंघात यंदा तिहेरी लढत रंगताना दिसणार आहे. दरम्यान, माहिमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजपकडून आला आहे. आपल्याच घरातील मुलगा निवडणूक लढवत असेल तर महायुतीने त्याला पाठिंबा देऊन का निवडून आणू नये, असं आशिष शेलार म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देत प्रचारही केला होता. त्याचीच परतफेड म्हणून माहिमसह शिवडीमध्ये भाजपने मनसेला पाठिंबा देण्याचं म्हटलं होतं. त्यामुळे माहिममध्ये सदा सरवणकर यांची उमेदवारी रद्द होणार का अशी चर्चा असताना समाधान सरवणकरांचं स्टेटस चर्चेत आलंय. सदा सरवणकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे यामध्ये म्हटलंय.