महायुतीत खटके! अजित पवार उर्मट, आजही त्यांची गुर्मी कायम… विजय शिवतारेंचा हल्लाबोल
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भाष्य करत बारामतीमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. महायुतीत आल्यावरही त्यांची गुर्मी तशीच होती. त्यांचा उर्मटपणा कायम असल्याचे शिवतारे यांनी म्हटले.
पुणे, १३ मार्च २०२४ : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भाष्य करत बारामतीमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, 2019 च्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्या मुलाविरोधात प्रचार केला पण तो राजकारणाचा भाग होता, अजित पवार यांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली. मी २३ दिवस रुग्णालयात होतो, ट्रीटमेंट सुरू असतानाही मी अँब्युलन्समधून प्रचार केला. मरायला लागलात तर कशाला निवडणूक लढवताय? तुम्ही खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे खोट बोलत आहात, असा खालच्या थराचा आरोप त्यांनी केला. तू कसा पुढे निवडून येतोस तेच मी बघतो… महाराष्ट्रात मी कोणाला पाडायचं ठरवलं तर मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतोच असेही अजित पवार म्हणाल्याचा आरोप शिवतारेंनी केला. मी त्यांना त्यांच्या उर्मट भाषेसाठी मी त्यांना माफ केलं. ते महायुतीत आल्यानंतर भेटून मी त्यांचा सत्कारही केला. पण पुढचे सहा ते सात महिने त्यांची गुर्मी तशीच राहिली, असं विजय शिवतारे म्हणाले. महायुतीत आल्यावरही त्यांची गुर्मी तशीच होती. त्यांचा उर्मटपणा कायम असल्याचे शिवतारे यांनी म्हटले.