मविआ v\s शिंदेंची शिवसेना आमने-सामने, मुंबईच्या बीकेसीमध्ये बॅनरबाजी
VIDEO | मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकासआघाडी आणि शिंदे गटाचे बॅनर्स आमने सामने, बॅनरबाजीचं नेमकं कारणं काय?
मुंबई : आज 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरनंतर आता तिसरी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ही मुंबईत होणार आहे. मुंबईतल्या बीकेसी येथील मैदानावर या सभेची तयारी पुर्ण झाली आहे. ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ही संपूर्ण सभा होणार आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना काय संबोधित करणार हे देखील महत्त्वाचे आहे. तर मुंबईतील बीकेसीच्या मैदानातून उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर नेमकं कोण असणार? हे देखील आजच्या मविआच्या जाहीर सभेतून समोर येणार आहे. दरम्यान, मुंबईच्या बीकेसी परिसरात जिथे शिवसेनेची वज्रमूठ सभा होणार आहे त्या परिसरामध्ये शिंदे गटाकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारे फलक झळकले. सभेच्या पूर्वीच शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. माहीम ते बीकेसी आणि विलेपार्ले ते बीकेसी पर्यंत शिंदे यांच्या शिवसेनेचे सगळीकडे बॅनर्स आणि पोस्टर्स लागल्याचे पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे बीकेसी, कुर्ला, दादर आणि बांद्रा परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे बॅनर्स दिसताय, त्यामुळे मविआ आणि शिवसेना आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.