Special Report | संजय मंडलिकांविरोधात शिवसैनिक आक्रमक, शिवसैनिकांकडून मंडलिकांच्या घरावर मोर्चा
शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असं कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही खासदारांनी सांगितलं होतं. पण हे दोघेही नंतर नॉट रिचेबल झाले. दिल्लीत जात थेट शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळं कोल्हापुरातल्या शिवसैनिकांनी पहिल्यांदा खासदार धैर्यशील माने आणि आज संजय मंडलिक यांच्या घरावर मोर्चा काढला.
मुंबई : कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्याविरोधात कोल्हापुरातले शिवसैनिक( Shiv Sainik) असे आक्रमक झाले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर संजय मंडलिकही(Sanjay Mandalik) शिंदे गटात सामील झाले. त्यामुळं कोल्हापुरातल्या शिवसैनिकांचा पारा चढला. शिवसैनिकांनी शेकडोंच्या संख्येनं मंडलिकांच्या घरावर मोर्चा काढला. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर कोल्हापुरातले माजी आमदार राजेश क्षीरसागर पहिल्यांदा शिंदे गटात गेले. त्यावर खुद्द संजय मंडलिकांनीच टीका केली होती. आपल्याबाबतही शिंदे गटात जाणार असल्याच्या अफवा उठत असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असं कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही खासदारांनी सांगितलं होतं. पण हे दोघेही नंतर नॉट रिचेबल झाले. दिल्लीत जात थेट शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळं कोल्हापुरातल्या शिवसैनिकांनी पहिल्यांदा खासदार धैर्यशील माने आणि आज संजय मंडलिक यांच्या घरावर मोर्चा काढला. विकासकामांना निधी मिळत नसल्याची तक्रार करत मंडलिकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मंडलिक यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवलीय. मंडलिक यांचे विरोधक धनंजय महाडिक आता राज्यसभेवर गेले आहेत..त्यामुळं खासदारकीसाठी मंडलिकांचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टाचा निर्णय शिवसेनेच्या विरोधात गेला तर भाजपमध्ये जाऊनही मंडलिक निवडणूक लढवू शकतात. मंडलिकांनी आपल्या राजकीय भविष्याचा विचार करुन जरी हा निर्णय घेतला असला…तरी हा निर्णय सर्वसामान्य शिवसैनिकांच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळंच खासदारांच्या घरावर शिवसैनिक मोर्चे काढतायत. त्यांचा उल्लेख गद्दार असा करतायत.