Eknath Shinde Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेची यादी जाहीर, ‘या’ 20 जणांना उमेदवारी? बघा दुसऱ्या यादीत कोण बडे नेते?
Shiv Sena Eknath Shinde Candidate 2nd List for Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. बघा यामध्ये कोणा-कोणाला मिळाली संधी?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली वहिली यादी 23 ऑक्टोबर रोजी मंगळवारी जाहीर करण्यात आली होती. शिंदे गट शिवसेनेकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता काल रविवारी 27 ऑक्टोबर रोजी शिंदेंच्या शिवसेनेकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आणखी 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत अनेक मोठ्या नेत्यांची नावे आहेत. या यादीत वरळी, अंधेरी पूर्व, रिसोड, पुरंदर, कुडाळ आदी मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे. मिलिंद देवरा (वरळी), मूरजी पटेल (अंधेरी पूर्व), भावना गवळी (रिसोड) यांसारख्या प्रमुख नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर अक्कलकुआमधून आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बाळापूरमधून बळीराम शिरसकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांचा सामना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्याविरोधात असणार आहे. यासोबतच कल्याण पश्चिम मतदारसंघातून विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भोईर हे येथील विद्यमान आमदार आहेत. तर अंबरनाथमधून ज्येष्ठ नेते तथा विद्यमान आमदार बालाजी किणीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.