रविंद्र चव्हाण कुचकामी, केवळ चमकोगिरी… शिवसेना नेत्याकडून हल्लाबोल करत राजीनाम्याची मागणी
भाजपचे मंत्री नेते रविंद्र चव्हाण यांच्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी सडकून टीका केली आहे. रविंद्र चव्हाण हे कुचकामी आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. इतकंच नाहीतर त्यांच्यावर जिव्हारी लागणारे शब्द रामदार कदमांनी टीका करताना वापरलेत.
रविंद्र चव्हाण यांनी केवळ चमकोगिरी करण्यापेक्षा काम करावं, असा खोचक सल्ला देत १४ वर्ष होऊन गेली तरीही मुंबई-गोवा रस्त्याचा वनवास सुरू असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले असून रविंद्र चव्हाण यांना चांगलंच फटकारलं आहे. ‘नुसती शाईनिंग मारण्यापेक्षा कामं करावी, अनेक कामं झालेली नाहीत. एक रस्ता असेल तर त्यात खड्डेच खड्डे आहेत. नुसते पाहणी दौरे कशासाठी? खरंतर देवेंद्र फडणवीस यांनी रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यायला हवा’, अशी मागणी करत रामदास कदम यांनी रविंद्र चव्हाणांचा उल्लेख कुचकामी मंत्री म्हणून केला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, कोकणातील माणसाचे हाल होत आहेत. ते लोकं मला जाब विचारत आहेत. १४ वर्षांनंतर प्रभू रामाचाही वनवास संपला होता. पण मुंबई-गोवा रस्त्याचा वनवास अजून सुरूच आहे. जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे, केवळ चमकोगिरी करत आहेत, असे म्हणत कदमांनी चव्हाणांवर हल्लाबोल केला आहे.