Sanjay Shirsat : राज्यात ‘गुवाहाटी पार्ट-2’ होणार? ‘गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर…’, संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्रात नुकतंच विधानसभा निवडणूक पार पडली. येत्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे ज्या दिशेने जातील त्या दिशेला आम्ही जाऊ असं संजय शिरसाट म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर काय? या प्रश्नावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, एकनाथ शिंदे योग्य दिशेने जात असतात हा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे. म्हणून त्यांच्या मागे आम्ही जाऊ. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत. तर ‘गुवाहटी पार्ट -2’बाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, गुवाहाटी पार्ट-2ची आवश्यकता नाही, आम्ही आता दुसरा प्रदेश पाहू. भारतभ्रमण करण्याची आमची हौस आहे. भारत आमचा देश आहे. आम्ही कुठेही जाऊ, राहू, याची चिंता करू नये, असं मिश्किल भाष्य देखील संजय शिरसाट यांनी केलं. तर निकालानंतर महायुतीचे नेते एकत्रित बसून ठरवणार आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे. सध्या आलेला एक्झिट पोल हा सर्व्हे आहे. अजून 23 तारखेचा निकाल लागू द्या. परंतु आम्हा सर्वांना आणि राज्यातील सामान्य नागरिकांना वाटते शिंदे साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील, असा विश्वासही शिरसाटांनी व्यक्त केला आहे.