‘काय झाडी.. काय डोंगर’ डायलॉगबाजी करणारे शहाजीबापू पुन्हा चर्चेत, आता काय म्हणाले?
VIDEO | एकनाथ शिंदे यांना शिवी ही तमाम महाराष्ट्राला शिवी, शहाजीबापू पाटील कुणावर बरसले
सातारा : साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदार संघातील मरळी येथे शासन आपल्या दारी या अभियानाच्या वेळी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी विरोधकांना इशारा देता शहाजीबापू म्हणाले, एकनाथ शिंदे यांना शिवी म्हणजे ही तमाम महाराष्ट्राला शिवी आहे. महाराष्ट्राची जनता याला माफ करणार नाही तर त्याला सडेतोड उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तर काय झाडी.. काय डोंगर या गाजलेल्या डायलॉगप्रमाणे शिंदे सरकारही एकदम ओक्के असल्याचा दावाही शहाजीबापू यांनी केला आहे. ते म्हणाले, काय ते शिंदे सायबाचं उद्घाटन, काय ते शासनदरबारी कार्यक्रम काय ते शंभुराज देसाई, काय ते शिंदे सरकार एकदम ओक्के असल्याचे शहाजीबापू म्हणाले. राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पाटण येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला असून राज्य सरकारच्या उपक्रमातील लाभाचे प्रमाणपत्र, दाखले, उतारे सर्वसामान्य नागरिकांना हवी असतात ही सर्व कागदपत्रे सरकारच्या प्रतिनिधींनी सर्वसामान्य माणसांच्या दारात येऊन देण्याचा हा उपक्रम आहे. हा सातारा पॅटर्न पुढील महिनाभरात व्यवस्थित राबवला जाणार असून याचे कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केले आहे.