श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, ‘तुमच्या आजी संविधान विरोधी…’
राज्यघटनेत कुठेही मक्तेदारी असावी,अग्निवीर असावेत असे कुठेही लिहिलेले नाही, असे म्हणत राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दाव्यांवर निशाणा साधत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
भाजपचे लोक 24 तास संविधानावर हल्ला करत आहेत. आम्ही सर्व मिळून संविधानाचे रक्षण करतोय, अशी इंडिया आघाडीची विचारधारा आहे. भाजपचे लोक जिथे जातात तिथे द्वेष पसरवतात. राज्यघटनेत कुठेही मक्तेदारी असावी,अग्निवीर असावेत असे कुठेही लिहिलेले नाही, असे म्हणत राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दाव्यांवर निशाणा साधत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीचा नुकताच झालेला विजय संविधानाच्या ताकदीमुळे आहे. तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता सादर करू शकली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी इंदिरा गांधी यांचे एक उदाहरण दिल्यानंतर लोकसभेत चांगलाच हंगामा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस आणि भाजपा सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला.
यावेळी लोकसभेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का ? असा थेट सवालही त्यांनी केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर देताना म्हटले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिराजींना निवडणुकीतील हेराफेरीप्रकरणी अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता. हा निर्णय रोखण्यासाठी असंवैधानिक डावपेच अवलंबण्यात आले. अलाहाबादच्या मुख्य न्यायमूर्तींनी न्यायमूर्ती सिन्हा यांना डेहराडूनहून बोलावले. हा निर्णय जुलैपर्यंत पुढे ढकलण्यासाठी गृहमंत्रालयाचे सचिव दबाव टाकत आहेत. न्यायाधीशांच्या स्वीय सचिवाला धमक्या देण्यात आल्या. सीआयडीचे स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्यात आले होते. आणीबाणीच्या काळात ना विरोधक, ना जनता, ना न्यायाधीश सुरक्षित होते, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.