‘मला काही सांगायचंय…’, महाराष्ट्रातील राजकारण अन् शिवसेनेतील उभी फूट आता रंगमंचावर
"मला काहीतरी सांगायचंय..." या एकपात्री नाटकाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय सांगणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या नाटक सेन्सॉर बोर्डाकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे.
गेल्या अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 बंडखोर आमदारांसह शिवसेना सोडली. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या या सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक राजकीय उलथा-पालथ झाल्याचे अवघ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाले. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेत पडलेली उभी फूट रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर केलं जाणार आहे. “मला काहीतरी सांगायचंय…” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित हे नाटक आहे. “मला काहीतरी सांगायचंय…” या एकपात्री नाटकाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय नाट्यमय प्रवास समोर येणार आहे. मुख्य भूमिकेत अभिनेता संग्राम समेळ असणार आहे. तर येत्या दोन दिवसात “मला काहीतरी सांगायचंय…” या एकपात्री नाटकाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.