‘तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट…’, ‘लाडक्या बहिणीं’वरून सुषमा अंधारेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल
“एखादी बहीण तुम्हाला ऐकत नाही, तुम्हाला जाब विचारते तेव्हा तुमच्यातील पुरुष जागा होतो आणि तिच्या बाईपणावर टीका करता. हे संस्कार बाळासाहेबांचे नाही. आनंद दिघेंचे नाही”, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी सरकारवर दसरा मेळाव्यातून टीका केली.
निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना सरकारकडून दरमहा १५०० रूपये दिले जात आहे. या योजनेवरून विरोधक चांगलाच हल्लाबोल करत असताना आज शिवाजी पार्कवर होत असलेल्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात या योजनेवरुन शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘आमच्या राज्यातील नागरिकांनी जो टॅक्स भरला त्याचे हे पैसे आहे. तुम्ही पोस्टमन आहात. बेक्कार क्रेडिट घेऊ नका’, असे म्हणत त्यांनी सडकून टीका केली आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या, १५०० रुपये मिळतात ते काही फडणवीस यांनी नागपूरचा बंगला विकून दिला नाही. शिंदेंनी तापोळ्याची जमीन विकून दिले नाही. हे पैसे आमच्या कष्टाचे आहे. आपण बहिणीच्या घरी गेल्यावर तिला पैसे देतो, तेव्हा काय बस स्टँडवर बॅनर लावला का? आपण बहिणीला पैसे दिल्यावर कधी जाहिरात बाजी करत नाही. कारण आपल्याला नातं आणि नात्याची मर्यादा कळते. आपण बहिणीच्या गरीबीची थट्टा केली नाही. आणि हे मात्र बॅनर लावून बहिणींची थट्टा करत आहे, असेही त्या म्हणाल्या.