‘भाजपची नजर चिनी’, संजय राऊत यांचा आशिष शेलार यांना नेमका काय टोला?
VIDEO | महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरून भाजपच्या आशिष शेलार यांनी केलेल्या 'त्या' टीकेला, संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
मुंबई : मुंबईच्या बीकेसी येथे काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेला उपस्थितांच्या संख्येवरुन महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. पण त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फोटो ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “आजची वज्रमूठ सभा. बीकेसी वांद्रे..1 मे.. भाजपच्या चिनी नजरेतून सगळ्यात लहान मैदानावरची लहान सभा. डोळ्यात महाराष्ट्र द्वेषाचा वडस वाढला असेल तर ऑपरेशन करून घ्या. हे तुफान थांबणार नाही”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं. तर “आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत. त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात. पण ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. तिघे एकत्र आले तरी अजूनही भय संपले नाही. गोळाबेरीज सुरूच आहे. दुसरं कारण मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरून सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे यांची वज्रमूठ”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती.