Sushma Andhare : ‘लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाचं कोंबडं, फरक नाही पडला तर…’, अंधारेंचा शिंदेंवर निशाणा
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी गेलेत. यासह एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी त्यांच्या गावी गेल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
राज्यात सत्तास्थापन आणि मुख्यमंत्री कोण असणार? याची चर्चा सुरू असताना आणि अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नसताना अचानक राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी गेलेत. यासह एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी त्यांच्या गावी गेल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. त्या ट्वीट करत एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘ताप हाय का..ताप हाय का असं म्हणून नुसताच गाव गोळा काय करताय? बाहिरवसा झाला असंल. तीन वाटाची माती, (सुरतगुवाहाटीगोवा), लिंबू मिरची, काळी बाहुली, उलट्या पखाचं कोंबडं आणि जमलंच तर एखादं मुख्यमंत्रीपद/गृहमंत्रीपद उतरून टाका..! नाही फरक पडला तर EDचा X-ray काढून बघा..!!’, असं ट्वीटमध्ये म्हटलं असून त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एका चित्रपटातील व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठ दिवस उलटले. मात्र अद्याप सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. तब्बल 230 जागा मिळवत महायुतीने बहुमत मिळवलं मात्र नवं सरकार अद्यापपर्यंत स्थापन झालेलं नाही, यावरून विरोधकांची सत्ताधाऱ्यावर टीका सुरू आहे.