Uddhav Thackeray : भाजप पुन्हा सत्तेत येणार की नाही? नंदी बैलाला विचारा, उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
VIDEO | शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा होणार? शिंदे गट की ठाकरे गट? याचा पेच असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज बरेच वासुदेव आणि नंदीबैलवाले दाखल झाल्याचे पाहिला मिळाले, महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचे सेवेकऱ्यांनी पारंपरिक वेशात का घेतली उद्धव ठाकरे यांची भेट?
मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | आपला दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर थेट हल्लाबोल केला. नंदीबैलाला जरी विचारलं की भाजप पुन्हा सत्तेत येणार आहे का? तर तो देखील नाही म्हणेल असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे. आज राज्यातील विविध भागातून महाराष्ट्रातील आराध्य दैवतांच्या सेवेकऱ्यांनी पारंपारिक वेशात उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शेकडो वासुदेव आणि नंदीबैलवाले मातोश्री या निवासस्थानी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? कोणत्या मैदानावर होणार? याबाबत कार्यकर्त्यांना धाकधूक होती. कारण शिंदे गटाने देखील शिवतीर्थावर दावा केला होता. मात्र शिंदे गटानं आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थवरच होणार हे नक्की झाले. “शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा अशी 57 वर्षांची परंपरा आहे. ही पंरपरा कायम राहिलेली आहे. यावर्षीसुद्धा विजयादशमीचा दसरा मेळावा वाजतगाजत, उत्सहाने शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावरच होणार आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.