धनुष्यबाणाचा निर्णय लांबला, अंधेरी निवडणुकीत काय होणार, वाचा 3 पर्याय!
सध्या तरी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा हा निर्णय लांबणीवर पडल्याचं दिसून येतंय. अशा स्थितीत अंधेरी पोट निवडणुकीत काय होऊ शकतं, यासाठीचे तीन पर्याय आहे.
मुंबईः धनुष्यबाण (Bow and Arrow) कुणाचा हा फैसला आज निवडणूक आयोगामार्फत घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र तूर्तास हा निर्णय़ लांबणीवर पडला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून शिवसेनेवर (Shivsena) दावा सांगणारे पुरावे आज दुपारी सादर केले जातील. शिंदे गटाकडूनही आतापर्यंत प्रबळतेचा दावा सांगणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेत. मात्र सध्या तरी हा निर्णय लांबणीवर पडल्याचं दिसून येतंय. अशा स्थितीत अंधेरी पोट निवडणुकीत काय होऊ शकतं, यासाठीचे तीन पर्याय आहे.
ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी या पेचात कोणते पर्याय वापरले जाऊ शकतात, याचं विश्लेषण टीव्ही 9 वर केलं.
- शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून अंधेरी पोट निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करणार असतील तर निवडणूक आयोगाला धनुष्यबाण हे चिन्ह गोठवावं लागेल.
- जर शिवसेनेच्या एका गटानेच उमेदवार उभा केला आणि दुसऱ्या गटाने उमेदवार उभा केला नसेल तर निवडणूक आयोग अशा स्थितीत जो उभा आहे, त्याला तात्पुरतं बहाल करण्याची शक्यता आहे.
- निवडणूक आयोगाच्या कोणत्याही निर्णयाला आक्षेप असेल तर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो.
शिंदे गटाकडून आमदार आणि खासदार आमच्याकडून जास्त असल्याचा दावा केला जातोय. तर केवळ आमदार-खासदारांवरूनच संख्याबळ ठरू शकत नाहीत, असा दावा शिवसेनेनं केला आहे.
निवडणूक आयोग अशा स्थितीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि संस्थेत कुणाचं प्राबल्य आहे, या दोन निकषांवर निर्णय देत असते, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली.
दोन्ही गटांच्या दाव्यांनंतर आयोगाचं समाधान झालं नाही तर?
अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारांची अंतिम यादी तयार होईपर्यंत हा निर्णय झाला नाही तर निवडणूक आयोग धनुष्य बाणाचं चिन्ह गोठू शकतं. दोन्ही गटांच्या लोकांना तात्पुरतं निवडणूक चिन्ह दिलं जाईल, अशी शक्यता अॅड. निकम यांनी व्यक्त केली.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होत आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात ही निवडणूक होईल.
शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.