Breaking | नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर शिवसेना नेते आक्रमक
केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना पुन्हा एकदा जीभ घसरली. यावेळी त्यांनी केलेली टीका ही प्रत्येक शिवसैनिकाच्या जिव्हारी लागेल, अशीच आहे.
मुंबई : केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना पुन्हा एकदा जीभ घसरली. यावेळी त्यांनी केलेली टीका ही प्रत्येक शिवसैनिकाच्या जिव्हारी लागेल, अशीच आहे. “स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंत्रालयात मी उपस्थित असतो तर कानाखाली चढवली असती”, असं खतरनाक वक्तव्य नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलं. खरंतर देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात भाषण करताना मुख्यमंत्री अमृत महोत्सव हा शब्द विसरले होते. याच मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीत टीका केली. त्यांच्या या टीकेला शिवसेनेकडून आता सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे आणि खासदार विनायक राऊत यांनी राणे यांना उत्तर दिलं आहे. (Shivsena leaders slams Narayan rane over statement about CM Uddhav Thackeray)
आम्हा मावळ्यांमध्ये हात छाटण्याची ताकद : विनायक राऊत
“स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी नेहमीच चाटुगिरीची सवय लागलेल्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं आहे. पण एक लक्षात ठेवावं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे इतर कोणतेही नेते असतील, त्यांच्याबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्याचे हात छाटायची ताकद आम्हा मावळ्यांमध्ये आहे हे त्यांनी कदापि विसरता कामा नये”, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.
नारायण राणे यांचा आता फुगा फाटला : मनिषा कायंदे
“नारायण राणे यांचा आता फुगा फुटलेला आहे. ते ऑक्सिजनवर आहेत. सामान्य शिवसैनिकांनीच त्यांचा फुगा फोडलेला आहे. आता दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करण्यापलिकडे त्यांना कोणतंही काम राहिलेले नाही. त्यांच्यावर एकच जबाबदारी दिली गेली आहे. उद्धव ठाकरे, मातोश्री आणि शिवसेनेवर टीका करा हेच त्यांचं ऑक्सिजन आहे. हे त्यांनी केलं नाही तर त्यांचं मंत्रिपद जाणार आहे. त्यामुळे मंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांना हे करावच लागणार. त्यामुळे नारायण राणे काय करत आहेत याची आम्हाला अजिबात चिंता नाही”, असा घणाघात मनिषा कायंदे यांनी केला.
नारायण राणे याचं वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय?
राणे सध्या कोकणच्या दौऱ्यावर जनआशीर्वाद यात्रेसाठी आहेत. त्याच वेळेस राणे महाडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. ‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ , अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
चिपळूणमध्येही राणेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी टीका
नारायण राणे यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. चिपळूणमधील महपुराची पाहणी करण्यासाठी राणे आले असता, त्यांनी एका अधिकाऱ्याशी बोलताना सीएम बीएम गेला उडत असं वक्तव्य केलं होतं. नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले होते की, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.”
संबंधित बातमी : ‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंची जीभ घसरली
(Shivsena leaders slams Narayan rane over statement about CM Uddhav Thackeray)