ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंतांनी काय दिले संकेत?
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत भांबेड जिल्हा परिषद गटातील १८ गावातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उदय सामंत यांच्याकडून लांजा राजापूर विधानसभा मतदार संघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत देण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदार संघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. लांजा तालुक्यातील भांबेडमधील पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर किरण सामंत यांनी भांबेड जिल्हा परिषद गटाला सुरूंग लावला असल्याची चर्चा आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाल्याने शिंदे गटाची ताकद आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढली आहे. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा युवा अधिकारी विनय गांगण यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती, उपसभापती, काही गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य तर भांबेड ग्रामपंचायतच्या सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतले आहे. यावेळी लांजा राजापूर विधानसभा मतदार संघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळण्याचे उदय सामंत यांच्याकडून संकेत देण्यात आले.