Milind Narvekar | मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सॅपवरुन धमकी, सूत्रांची माहिती
Milind Narvekar | मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आरोपींनी नेमकी कोणती मागणी केली, याचे तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. मात्र ईडी, एनआयए आणि सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी मिळाल्याचा आरोप होत आहे. आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू, अशी अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आरोपींनी नेमकी कोणती मागणी केली, याचे तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. मात्र ईडी, एनआयए आणि सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. याबाबत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे नार्वेकरांनी तक्रार दाखल केली असून त्याबाबत काय पावलं उचलली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.