बाप्पाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, दादरच्या सिद्धीविनायक मंदिराचा होणार कायापालट, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर दादरच्या सिद्धीविनायक मंदिर परिसराचा विकास होणार आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच मंदिर विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होणार...
मुंबई, १३ मार्च २०२४ : उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर दादरच्या सिद्धीविनायक मंदिर परिसराचा विकास होणार आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच मंदिर विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचे पत्र दिलं आहे. प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याकरीता मुंबई महानगरपालिकेने हा विशेष प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पांतर्गत सिद्धीविनायक मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यासह मंदिर परिसराचे पुनर्नियोजनही करण्यात येणार आहे. तर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, सुशोभिकरण, पूजा साहित्य विक्रेत्यांची व्यवस्था अशा कामांचा यामध्ये समावेश आहे. या कामाचा डीपीआर तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूकही करण्यात येणार आहे.