एअर इंडियाची काही उड्डाणं रद्द तर काही उड्डाणं उशिरानं, काय आहे कारण?
VIDEO | ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा एअर इंडियाच्या विमान सेवेला फटका?
मुंबई : हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एअर इंडियाची काही उड्डाणं रद्द तर काही उड्डाणं उशिरानं धावत असल्याची माहिती समोर आली आहे. खराब हवामानामुळे मुंबई विमानतळावरील एक रनवे तात्पुरते बंद करण्यात आले आहे. आज सोमवारी सकाळी एअर इंडियाने एक ट्विट केले. या ट्विटमध्ये असे म्हटले की, खराब हवामानामुळे मुंबई विमानतळावरील धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे काही उड्डाणे उशीर झाली आणि काही रद्द करण्यात आली आहे. तर ‘खराब हवामान परिस्थिती आणि मुंबई विमानतळावरील रनवे 09/27 तात्पुरते बंद करण्यात आले आहे. आमच्या नियंत्रणाबाहेरील इतर परिणामकारक घटकांव्यतिरिक्त आमच्या काही उड्डाणे विलंब आणि रद्द करण्यात आली आहेत. आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, कारण आम्ही व्यत्यय कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करतोय’, असे एअर इंडियाने म्हटले आहे. अशातच ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत असताना, मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर किनारपट्टी भागात रविवारी रात्री पाऊस जोरदार वारे वाहताना दिसले.