‘धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग…’, अजित दादांचा कोणाला खोचक टोला?
धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणत खेकड्यानं धरण फोडलं, अजित पवार यांनी नाव न घेता तानाजी सावंत यांना खोचक टोला लगावला आहे. तर काहीजण चुकीचं वागत आहेत, त्यांना मी इशारा दिला असल्याचे अजित पवार यांनी म्हटलंय.
धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणत खेकड्यानं धरण फोडलं, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला. ‘तिवरे धरण फुटल्यानंतर अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारणा केली असता, ते म्हणाले… धरणाला तडा गेला नाहीतर ते खेकड्यांनी फोडलं. खेकडा धरण फोडू लागला तर आपलं दिवाळंच निघायचं. एवढं बारीक धरण असतं की जे खेकडा फोडू शकतो. काहीपण सांगतात. पण याची चौकशी गेली. काही जण चुकीचं वागताय त्यांना मी निर्वाणीचा इशारा दिला आहे.’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर नुकतंच भाजप नेते नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अजित पवार यांनी नितेश राणे यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यानंतर त्यांना इशारा दिला आहे. ‘कुठल्याही जाती, धर्म आणि पंथांनी एकमेकांचा अनादर करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही सगळे १८ पगड जाती, १२ बलुतेदारांना योग्य पद्धतीचा न्याय मिळत होता. त्यामुळे त्यांच्याच विचारांचं हे राज्य आहे. पण काहीजण बोलता-बोलता कोणत्याही प्रकारची भाषा जी वापरली नाही पाहिजे तशी भाषा वापरतात.’, असे अजित पवार म्हणाले.