‘तर मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार का?’, विजय वडेट्टीवार यांचा थेट सवाल
VIDEO | राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला हल्लाबोल यासह भाजपवरही साधला निशाणा
नागपूर, ४ सप्टेंबर २०२३ | राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मराठा आरक्षणासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली आहे, यातून आता कोणता मार्ग सरकारकडून काढला जाईल याकडे साऱ्याचे लक्ष लागलेले असताना विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, शिंदे-फडणवीस हे सरकार येऊन सव्वा-दीड वर्ष झाले, तरी हा बैठकींचा फार्स सुरू आहे. सव्वा वर्षांत का आरक्षण दिलं नाही? आता लाठीचार्जनंतर बैठक घेऊन काय करणार? आरक्षण मिळालं नाही तर अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार का? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजप घराघरात भांडण लावत आहे आणि भविष्यात त्याचे परिपाक बघायला मिळणार आहे. कारण तोडा फोडा राज्य करा, अशी निती इंग्रजांची होती. इंग्रजांकडून ट्रेनिंग घेतलेले हे लोक आहेत. कुटुंब उद्ध्वस्त करण्याची यांची अनेक वर्षापासूनची भाजपची परंपरा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.