Narehari Zirwal : ‘बजरंगाच्या छातीत श्रीराम तर माझ्या छातीत शरद पवार, त्यांच्यासमोर लोटांगण घालणार’, नरहरी झिरवाळ नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं पाहिजे, असं साकडं पांडुरंगाला घातलं आहे. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ काय म्हणाले?
‘राज्यात अनेकांच्या अपेक्षा असतात. ज्याचा हात जगन्नाथ असतो. त्यांच्या हाताला यश मिळालं. मी खरंच नशीबवान आहे. उपाध्यक्ष, अध्यक्षपद मिळालं. उपाध्यक्ष कधी निवडून येत नाही म्हणायचे. पण मी निवडून आलो आहे’, असं राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळांनी म्हटलं. तर माझं खातं नवीन आहे, पण मी जुना आहे. मला सर्वांच्या आशीर्वादाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं पाहिजे, असं साकडं पांडुरंगाला घातलं आहे. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ बोलताना म्हणाले, दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे ही पांडुरंगाला विनंती करतो. राजकारणात काही गोष्ट घडून गेली. आम्ही पवार साहेबांना सोडून गेलो. मात्र लोकांनी आम्हाला निवडून दिलं. तर मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. साहेब निश्चित विचार करतील. राजकारणात त्याचा वापरही केला गेला. पहाटे शपथ झाली तेव्हा मी दिल्लीला पळून गेलो अशी माझ्यावर टीका झाली. त्यावेळी मी सांगितले होते की, बजरंगाच्या छातीत प्रभू श्री राम दिसले होते. तशी माझी छाती फाडली तर शरद पवार साहेबच दिसतील. ते पुढे असेही म्हणाले, मी ज्या दिवशी अजितदादांसोबत गेलो, त्यानंतर शरद पवार यांच्यासमोर गेलो नाही. कोणत्या तोंडाने मी साहेबांपुढे जाऊ? मी साहेबांना प्रभू रामाच्या जवळचं स्थान देतो. प्रभू रामचंद्राच नाव घेऊन मी साहेबांना फसवलं. मला हा निर्णय घ्यायला भाग पडलं, याच मूल्यांकन मीच करू शकतो. आता पवारसाहेबांकडे जाऊन लोटांगण घालून पाया पडणार असल्याचेही झिरवाळ म्हणाले.