‘तो’ बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारलं, राज्य महिला आयोगाकडून सुप्रीम कोर्टाचे आभार
अलाहाबाद हायकोर्टाने स्तन पकडणे अथवा पायजाम्याची नाडी तोडणे हा बलात्कार नसल्याचा निर्वाळा दिला होता. तर हा एक गंभीर लैंगिक छळ असल्याचे म्हटले आहे.
राज्य महिला आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचे नुकतेच आभार मानले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिलेल्या स्थगितीचं स्वागत करण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलीला नको तिथे स्पर्श करणं आणि पायजम्याची नाडी खेचणं हा बलात्कार किंवा बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून देण्यात आला होता. यालाच सर्वोच्च न्यायालयाने आता फटकारलं आहे. यानंतर राज्य महिला आयोगाकडून यावर भाष्य करण्यात आलं असून यासंदर्भात ट्वीट करण्यात आलं आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिलेल्या स्थगितीचे स्वागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद न्यायालयाचे आदेश असंवेदनशील, अमानुष असल्याचे म्हणत केंद्र, राज्य व इतर पक्षकारांकडून उत्तर मागविले आहे.’, असं राज्य महिला आयोगाने म्हटलंय. तर स्थगिती दिल्याने तसेच याबाबत उत्तर मागितल्याने याआधी झालेली चूक सुधारली गेली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशातील न्यायिक यंत्रणा कटिबद्ध असल्याचेही राज्य महिला आयोगाकडून ट्वीट करण्यात आलंय.