SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 22 August 2021
काळू पवार (48) असे या दुर्दैवी कातकरी शेत मजुराचे नाव असून त्याने मुलाच्या अंत्यसंस्कारला कफन घेण्यासाठी रामदास कोरडे या मालकाकडून 500 रुपये उसने घेतले होते. ते पैसे फेडण्यासाठी रामदास कोरडेने काळुला गडी म्हणून राबवून पिळवणूक करत असल्यानेच कंटाळून अखेर त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा
पालघर जिल्ह्यातील मोखाडा या दुर्गम तालुक्यात एका मजुराला त्याच्या मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करण्याची वेळ ओढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काळू पवार (48) असे या दुर्दैवी कातकरी शेत मजुराचे नाव असून त्याने मुलाच्या अंत्यसंस्कारला कफन घेण्यासाठी रामदास कोरडे या मालकाकडून 500 रुपये उसने घेतले होते. ते पैसे फेडण्यासाठी रामदास कोरडेने काळुला गडी म्हणून राबवून पिळवणूक करत असल्यानेच कंटाळून अखेर त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप त्याची पत्नी सावित्री पवार हिने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी मालक रामदास अंबु कोरडे याच्या विरोधात मोखाडा पोलिस ठाण्यात “बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६” अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मोखाडा तालुक्यातील कातकरी वाड्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ही घटना उघडकीस आली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील कातकरी शेतमजुराला मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करावी लागली आणि वेठबिगारीच्या पाशात अडकून आत्महत्या करावी लागते ही अत्यंत गंभीर व वेदनादायी आणि चीड आणणारी घटना आहे, असा संताप पंडित यांनी व्यक्त केला आहे. अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही पंडित यांनी म्हटले आहे.