Ranjit Kasle : सिस्टिमच्या विरोधात लढता येत नाही, मी पोलिसांना शरण येतो; कासलेचा नवा व्हिडीओ
Beed Suspended Police Ranjit Kasle Video : मला पकडून दाखवा असं बीड पोलिसांना चॅलेंज करणारे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी आणखी एक व्हिडीओ बनवून आपण पोलिसांना शरण येत असल्याचं सांगितलं आहे.
बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले ही पोलिसांना शरण येणार आहेत. याबद्दल एक व्हिडीओ शेअर करत कासले यांनी आपण बीड पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती दिली आहे.
बीडच्या मस्साजोगचे मकजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी रणजित कासले यांना निलंबित करण्यात आलेले आहे. त्यानंतर त्यांनी याच प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचा बोगस एन्काउंटर करण्याची आपल्याला ऑफर मिळालेली असल्याचा दावा कासले यांनी व्हिडीओ शेअर करून केला होता. त्यासाठी आपल्याला 5 ते 50 कोटींची ऑफर मिळाली असल्याचं देखील त्यांनी व्हिडीओमध्ये म्हंटलं होतं. त्यानंतर आणखी एक व्हिडीओ बनवत वाल्मिक कराड याचा एन्काउंटर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनाच करायचा असल्याचा गंभीर आरोप कासले यांनी केला होता. आता रणजित कासले यांनी आणखी एक व्हिडीओ बनवून मी बीड पोलिसांना शरण येणार असल्याचं म्हंटलं आहे. सिस्टिमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही, हे मला जाणवलं आहे. मी ज्यांच्यावर आरोप केले होते तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वॉशिंगमशीन मधून ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत, असा मोठा दावा देखील कासले यांनी केला आहे.