मोर्चे काढा , जीआरची होळी करा, विरोधी पक्षनेते इतके का संतापले?
मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची सरकार फसवणूक करत आहे. दिशाभूल करत आहे. ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा छुपा अजेंडा आहे. कंत्राटी भरतीचा जो जीआर आहे तो खतरनाक आहे अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
चंद्रपूर : 17 सप्टेंबर 2023 | ओबीसी समाजाचे 7 दिवस झाले आंदोलन सुरु आहे. पण याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. हे आंदोलन संपविण्यासाठी सरकारला विनंती करतो. सरकारने स्वतः येऊन हे उपोषण संपवावे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारने जरांगे पाटील यांना काय आश्वासन दिले ते ओबीसी समाजाला कळले पाहिजे. मराठ्यांना आरक्षण देताना ते ओबीसींच्या वाट्यातून देऊ नये. तसेच, कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मराठ्यांना देणे धक्कादायक आणि चुकीचे आहे, असे ते म्हणाले. दोन्ही समाजाला धोका देण्याचे काम सरकार करतेय. ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा छुपा अजेंडा आहे. कंत्राटी भरतीचा जो जीआर काढला आहे तो खतरनाक आहे. सत्ताधा-यांच्या लोकांना कंत्राट देणारा आणि तरूणांची दिशाभूल करणारा हा निर्णय आहे. हा जीआर लागू झाला तर भविष्यात तरूणांना धोका निर्माण होईल. त्यांच्या मर्जीतल्या लोकांनाच नोकऱ्या मिळतील तरूणाईला उध्वस्त करण्याचे काम हे नालायक सरकारने केले आहे. त्याविरोधात मोर्चे काढा त्या जीआरची होळी करा, असे विरोधी पक्षनेते म्हणाले.