भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद? पुन्हा हातमिळवणी करणार?
मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरे यांच्या सख्या बहिणीच्या मुलाचा आज लग्न सोहळा आहे. या लग्न सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र दिसले
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. निमित्त होतं भाच्याचं लग्न… माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या बहीण जयंवती देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांचा विवाह सोहळा काल पार पडला. दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. याच विवाह सोहळ्यातच राजकारणातील ठाकरे बंधू एकत्र असल्याचे दिसून आले. प्रचंड मोठ्या उलथा-पालथी आणि प्रदीर्घ काळानंतर मुंबईत दोन्हीही ठाकरे बंधू भाच्याच्या लग्नानिमित्ताने एकत्र आलेत. यावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि रशमी ठाकरे या तिघांनी संवाद साधला. ठाकरे कुटुंबातील सगळेच या विवाह सोहळ्याला हजर होते. दरम्यान, विधानसभेच्या निकालानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येतील का याची चर्चा रंगली होती. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पहिल्यांदा कमी जागा जिंकता आल्यात. तर दुसरीकडे स्थापनेपासून मनसेला पहिल्यांदा एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा होत्या. तर दोघांच्या या भेटीमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात.