‘हिम्मत असेल तर स्मृती इराणी आता चोळी बांगड्यांचा आहेर मोदी यांना पाठवणार का?’, सुषमा अंधारे यांचं आव्हान
VIDEO | राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किस प्रकरणावरून सुषमा अंधारे या स्मृती इराणी यांच्यावर बरसल्या, नेमका काय केला हल्लाबोल?
पुणे, १० ऑगस्ट २०२३ | ‘मणिपूरमध्ये तुम्ही भारतमातेची हत्या केली आहे. भारत एक आवाज आहे. त्या आवाजाची हत्या मणिपूरमध्ये करण्यात आली आहे.तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशप्रेमी नाही.’, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत मणिपूरच्या हिंसेवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर यावर प्रत्युत्तर देताना भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार पलटवार केला. लोकसभेत मणिपूर मुद्द्यावरून झालेल्या गदारोळावर आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. “स्मृती इराणी सोयीस्कर राजकारण करतात. ज्या स्मृती इराणी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंगांना निर्भया प्रकरणावरून साडीचोळीचा आहेर पाठवला, आता हिम्मत असेल तर त्याच इराणी आता मणिपूरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोळी बांगड्यांचा आहेर पाठवणार का? धमक दाखवणार का?, असा सवाल त्यांनी केला. तर त्यांना प्रसिद्धी हवी असते म्हणून सोयीस्कर बोलत असतात” अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली.