फोटोसाठी एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, कुणी केला मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
VIDEO | राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, शिंदेंच्या दौऱ्यावरून विरोधकांचं टीकास्त्र
मुंबई : राज्यभरात अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरम्यान, अयोध्येच्या दौऱ्यावरून राज्यात परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करंजाडी परिसरातील निताणे, बिजोटे, आखतवाडे येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याभागाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यावरही टीका केली आहे. फोटोसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. मुख्यमंत्री शिंदेंकडून दहीहंडी मंडळांपासून शेतकऱ्यांपर्यंत फक्त आश्वासन दिले जातात असे म्हणत शिंदे भाजप सरकार अल्पावधीचं आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.