‘राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर…’, राजन तेलींच्या सोडचिठ्ठीवरून ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी झाली तेव्हापासून आम्ही उद्धव ठाकरेंसह जनते सोबत आहोत. त्या अडीच वर्षापासून उद्धव ठाकरेंनी आम्हाला मतदारसंघात काम करण्याचा आदेश दिलेला आहे. उद्धव ठाकरे यांची तब्येत सुधारल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी AB फॉर्मच वाटप होईल', असं ठाकरेंच्या आमदारानं सांगितलं.
कोकणातील भाजप नेते आणि माजी आमदार राजन तेली हे आज भाजपला राम राम करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार आहेत. अशातच या पक्षप्रवेशासंदर्भात ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैभव नाईक म्हणाले, 10 वर्षांपूर्वी नारायण राणेंच्या कारभाराला, घराणेशाहीला कंटाळून जिल्ह्यातील काही महत्वाचे पदाधिकारी बाहेर पडले होते. यामध्ये राजन तेलींसह काही नेत्यांचा समावेश आहे. राजन तेलींनी गेली 10 वर्षे भाजपचे काम प्रामाणिक करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता नारायण राणे आणि त्यांच्या चिरंजीवांचा हस्तक्षेप वाढल्याने आता न्याय मिळणार नाही हे त्यांना कळलं. यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय मिळत नसल्याने येणाऱ्या काळात ते शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावाही वैभव नाईक यांनी केला आहे. तर येणाऱ्या काळात राजन तेलींचा आम्हाला नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही वैभव नाईक यांनी व्यक्त केला. यावेळी वैभव नाईक यांनी भाजप आमदार निलेश राणे यांच्या उमेदवारीवर सवाल केला असता ते म्हणाले, त्यांची उमेदवारी कुठे आहे हे मी सांगू शकत नाही. पण माझी ही चौथी निवडणूक आहे, जी मी एकाच पक्षातून आणि एकाच पक्षाच्या नेतृत्वाखाली लढतोय आणि समोरचे उमेदवार वेगवेगळ्या चिन्हावर, वेगवेगळ्या पक्षावर निवडणूक लढवत असतात हा त्यांचा इतिहास आहे. त्यांच्यावर न बोललेले बरं असं म्हणत त्यांनी बोलणं टाळल्याचे पाहायला मिळाले.