शेम! यमाच्या रेड्यावर बसून मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची मौज, सामनातून शिंदे सरकारवर हल्लाबोल
VIDEO | गेल्या दोन दिवसांपूर्वी नांदेडच्या रूग्णालयात एकच खळबळ उडाली. नांदेड रूग्णालयातील मृतांच्या घटनेवरून ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला असून राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार बनला आहे, अशी टीका केली आहे.
मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | नांदेडच्या रूग्णालयातील मृतांच्या घटनेवरून सामना या वृत्तपत्रातून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार असल्याची खोचक टीका देखील सामनातून करण्यात आली आहे. यमाच्या रेड्यावर बसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मौज सुरू आहे. तर लोकांनी जगावे किंवा मरावे, यापेक्षा आमचेच राजकारण चालावे, असे या रेड्यावरील स्वारांना वाटत असल्याचा हल्लाबोलही केला आहे. ‘राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार बनला आहे. यमाच्या रेड्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मौजा मारीत आहेत. लोकांनी जगावे किंवा मरावे, यापेक्षा आमचेच राजकारण चालावे असे त्या रेड्यावरील स्वारांना वाटते. पुरोगामी महाराष्ट्राचे हे निर्दय आणि अमानुष चित्र आहे.’, असे भाष्य सामनातून करण्यात आले आहे. यासह नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपुरातील यमाचा दरबार महाराष्ट्राच्या इभ्रतीस काळिमा फासणारा आहे. या राज्यात आमदार-खासदारांना विकत घेण्यासाठी मुबलक पैसा आहे, पण शासकीय इस्पितळांत औषध खरेदीसाठी पैसे नाहीत. यमाचा रेडाही हे चित्र पाहून रडत असेल. शेम! शेम! शेम!’, असे म्हणत सडकून टीका करण्यात आली आहे.