‘…काही दम नाही’, सामनातून शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावर निशाणा
VIDEO | अजित पवार यांच्या गटाचा भाजपच्या दगडावर पाय, सामनातून थेट शरद पवार यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचं मुखपत्र सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी कॉंगेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी पक्षात काही बदल केले. त्यात धक्कादायक वगैरे काहीच दिसत नाही. शरद पवारांनी राष्ट्रीय पातळीवर दोन प्रमुख नियुक्त्या केल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली. यास काही जण शरद पवारांनी ‘भाकरी फिरवली’ असे म्हणत असतील तर त्यात दम नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. नागालॅण्डमध्ये त्यांचे चार-पाच आमदार निवडून आलेत. राज्याबाहेर लक्षद्वीप येथे त्यांचा एक खासदार आहे. केरळ विधानसभेत त्यांचे एक-दोन सदस्य आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्व काही आटोपशीर आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली ? सुप्रिया सुळे यांच्याकडेच पक्ष संघटनेची सूत्रे जातील हे नक्की होते, पण दुसरे कार्यकारी अध्यक्ष पटेल यांना नेमून पवार कोणता संदेश देत आहेत? सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपदी नेमल्याने घराणेशाहीचा आरोप होऊ नये यासाठी त्यांनी आणखी एक कार्यकारी अध्यक्ष नेमला असावा. असेही सामनातून म्हणण्यात आले आहे.