मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणार असाल तर मार्ग बदला; पाहा काय आहे रस्त्याची अवस्था…
रायगडमधून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था फार दयनीय झाली आहे. येथे प्रवास करताना अनेक वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर येथील 84 किलोमीटरचा रस्ताच हा खड्ड्यात गेल्याचे दिसत आहे.
रायगड :17 ऑगस्ट 2023 | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच पनवेल येथे मुंबई-गोवा महामार्गाबाबत निर्धार मेळाव्यातून तोफ डागली होती. तर चांद्रयानावर भला मोठा खर्च करण्यापेक्षा तो महाराष्ट्रातील रस्त्यांवर पाठवलं असते तर अशी टीका केली होती. त्यानंतर आता हा महामार्ग आता दृष्टीक्षेपात आला आहे. तर सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील कासू ते इंदापूरपर्यंतच्या महामार्गाची अत्यंत दयनी अशी अवस्था आहे. पळस्पे ते इंदापूर 84 किलोमीटरचा मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यांनी वेढलेला आहे. या महामार्गाचा पहिल्या टप्प्याचे काम दोन कंपन्यांना नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून देण्यात आलेलं होतं. परंतु या दोन्ही कंपन्यांनी सब टेंडर काढून दुसऱ्या कंपनींना या महामार्गाचे काम दिलेलं होतं. तब्बल 14 वर्षे झाली आहेत अजून देखील हा महामार्ग तयार होत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांचा रोष या महामार्गाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हजारो लोकांच्या मृत्यूला महामार्ग कारणीभूत ठरलेला आहे. या महामार्गाच्या संदर्भात आतापर्यंत अनेक आंदोलन, बैठका आणि सभा झालेल्या आहेत. परंतु या महामार्गाची अवस्था जैसे थे तशीच आहे. त्यामुळे आता या महामार्गाच्या प्रश्नांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे.