‘अजित पवार यांचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा…’ जयंत पाटलांनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं?
‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘लोकसभेचा महासंग्राम‘ या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुलाखत दिली. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला याबद्दल काही माहित होते का? असा सवाल केला असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले...
मुंबई, १ मार्च २०२४ : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आधीपासून संघर्ष दिसत होता का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला याबद्दल काही माहित होते का? असा सवाल केला असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “अजित पवार गटाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा मला माहिती नव्हतं. त्यादिवशी त्यांनी सर्व आमदारांना बोलवून बैठक बोलावली होती. त्यावेळी बऱ्याच आमदारांचा मला फोन आला. आम्ही तिकडे जातोय. जाऊ का? मी म्हटलं त्यांनी बोलावलं आहे तर जा. जायला काहीच हरकत नाही. मी माझ्या घरी आहे. तुमचं तिकडचं काम झाल्यावर माझ्याकडे या. काही आमदार मंत्री झाले त्यांनीही फोन केले. मी सर्वांना जा सांगितलं. त्याच्याआधी काही दिवस आधी अजित पवारांनी पक्षाची काही जबाबदारी द्या, अशी मागणी जाहीर व्यासपीठावर केली होती. त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं की त्यासाठी बोलवत आहेत. त्याठिकाणी त्यांनी जाऊन कशावर आमदारांच्या सह्या घेतल्या ते बहुतेकांना माहिती नव्हतं. सगळ्यांनी ते म्हणतील तिथे सह्याही केल्या. त्यानंतर ते राजभवनात गेले”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.