उदय सामंत आणि जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा, ‘आचारसंहिता लागू द्या, मग बघतोच…’
मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांची काल मध्यरात्री जालन्यात अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यात दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.
मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सरकारला पुन्हा थेट इशारा दिला आहे. ‘आमच्या मागण्या मान्य करण्याची अजून वेळ गेलेली नाही. सर्व मागण्याची अंमलबजावणी करा. तुमच्या राजकारणात मला आणि माझ्या मराठ्याला राजकारणाकडे जायचे नाही. पण तुम्ही मराठ्यांना दुर्लक्ष करून अन्याय करण्यासाठी सत्ता चालवत असाल तर माझे मराठे तुमची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. तुमच्या हातात अजूनही वेळ आहे. तुम्ही आचारसंहितेची तारीख पुढे ढकलून मराठ्यांना न्याय देऊ शकता, असे मनोज जरांगे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, तुम्ही कोणाचीही मागणी नसताना 16-17 जाती आरक्षणात घातल्या. तेही मराठ्यांना छेडून आणि मराठ्यांना खवळून. तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. ही जी खुन्नस दिली, त्याचे त्याचे परिणाम इतके वाईट होतील, की तुम्हाला पश्चाताप करायला वेळ राहणार नाही, अशा कठोर शब्दात जरांगे पाटलांनी इशारा दिला आहे.