काँग्रेसचे ९ नेते शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, सतेज पाटील यांच्या ‘त्या’ दाव्यावर उदय सामंत म्हणाले…
सतेज पाटील यांनी शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा केला. या सातही खासदारांनी तशाप्रकारचं लेखी कळवल्याचेही सतेज पाटलांनी म्हणत खळबळजनक दावा केला होता. यावर शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे
रत्नागिरी, ३ जानेवारी २०२४ : माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा केला. या सातही खासदारांनी तशाप्रकारचं लेखी कळवल्याचेही सतेज पाटलांनी म्हणत खळबळजनक दावा केला होता. यावर शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसचे ९ आमदार आणि नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. पूर्वी हा आकडा १३ होता पण आता तो चारने कमी झालाय, असा दावा उदय सामंत यांनी केलाय. तर काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे कळल्यामुळे सतेज पाटील यांनी ते वक्तव्य केल्याचेही उदय सामंत म्हटले आहे. पुढे उदय सामंत असेही म्हणाले की, आमचं कुणीही कोणाच्या संपर्कात नाही. आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवतो आणि एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो. मात्र आता १३ चा आकडा ९ वर आलाय तो पुन्हा १३ होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले.