Sanjay Raut : सकाळी 9.30 वाजता ‘ते’ दोघे आले अन् फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची कोणी केली रेकी?
संजय राऊत सकाळी ९.३० वाजता माध्यमांशी संवाद साधतात. त्यापूर्वी संजय राऊत यांच्या घराची रेकी दोन बाईकस्वारांनी केली. त्यांनी दहा मोबाईल कॅमेरे लावून रेकी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. संजय राऊत यांच्या घराच्या सीसीटीव्हीमधून हा प्रकार उघड झाला आहे. संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याची दोन बाईकस्वारांनी रेकी केली यावेळी त्यांनी राऊतांच्या घराचे काही फोटोही काढले. संजय राऊत सकाळी ९.३० वाजता माध्यमांशी संवाद साधतात. त्यापूर्वी संजय राऊत यांच्या घराची रेकी दोन बाईकस्वारांनी केली. त्यांनी दहा मोबाईल कॅमेरे लावून रेकी केली. ही माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींना समजल्यावर त्यांना रोखले. त्यानंतर ते बाईकस्वार पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या संजय राऊत यांच्या घरातील कुटुंबीय घरात नसून ते बाहेरगावी आहेत. मात्र बंगल्यात केवळ संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत होते. दरम्यान, संजय राऊत यांना महाविकास आघाडी सरकार असताना वाय प्लस सुरक्षा होती. त्यानंतर महायुती सरकार आल्यावर ही सुरक्षा काढली. आता संजय राऊत यांना साधी सुरक्षा देण्यात आली आहे. या प्रकारानंतर संजय राऊत यांनी सांगितले की, यापूर्वी मला धमकीचे फोन आले होते. तसेच रेकी करण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.