विधानसभेच्या प्रचाराचा पहिला गेअर पडला, ‘लाडकी बहीण’वरून ठाकरे अन् शिंदेंमध्ये जुंपली
विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्षांचे बडे नेते मैदानात उतरून प्रचारसभा घेताना दिसताय. लाडकी बहीण योजनेमुळे कोणाचं घर चालतं का? महागाईचं काय असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर टीका केली.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झालाय. अशातच लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली आहे. १५०० रूपये देतात पण महागाईचं काय? देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेट भाऊ म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर जोरदार निशाणा साधला. तर याला पाटणच्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पलटवार केलाय. उद्धव ठाकरेंनी राधानगरीमध्ये के.पी पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाटणमध्ये शंभूराज देसाईंसाठी सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. टप्प्यात सावज आल्यावर करेक्ट कार्यक्रम केला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तर दुसरीकडे भाजपच्या कटेंगे तो बटेंगे या कॅम्पेनवर उद्धव ठाकरेंनी ना तुटू देणार ना लुटू देणार असा पलटवार केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी पाच वायदे केले. तेल, डाळ, तांदूळ, साखर या वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार, मुलींसोबत मुलांनाही उच्च शिक्षण मोफत देणार, धारावीकरांसह मुंबईकरांना परवडणारी घरं देणार, महिला पोलिसांची भरती, महिला पोलीस स्टेशन तयार करणार आणि शेतमालाला हमीभाव देणार असं ठाकरे म्हणाले.