उन्मेष पाटलांना लोकसभेचं तिकीट नाहीच; कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कोण लढणार?
भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरे लोकसभेचं तिकीट देतील अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी जळगावमधून पाटील यांचे समर्थक करण पवार यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. भाजपने जळगावातून उन्मेष पाटील यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. दरम्यान, उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरे लोकसभेचं तिकीट देतील अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी जळगावमधून पाटील यांचे समर्थक करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाकरे गटाची दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पालघरमधून भारती कामडी यांना तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कल्याण-डोंबिवलीतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात रणरागिणी वैशाली दरेकर यांचा सामना होणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, धक्का खाणारी शिवसेना नाही तर शिवसेना जोरात धक्का देते, भूकंप होणार असं ऐकत होतो. आज कळलं भूकंप झाला. किडूकमिडूक गेलं तरी शिवसेनेला धक्का सांगितलं जात होतं. पण आज तुम्ही पाहिलं असेल, असे ते म्हणाले.