Uddhav Thackeray | आम्ही तोंडातून फक्त वाफा काढत नाही : उद्धव ठाकरे
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी जनतेला नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणाही साधलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेला नवीन वर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच दिवसांपासून माध्यमांसमोर किंवा जनतेसमोर आले नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही (Winter Session) मुख्यमंत्री अनुपस्थित राहिले. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकाही केली. आता मोठ्या कालावधीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समोर आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी जनतेला नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणाही साधलाय.
‘राजकारण म्हटल्यावर आपण काही केलं तर भ्रष्टाचार केला, नाही केलं तर यांनी काहीच केलं नाही. मग शेवटी आपली टिमकी आपल्यालाच वाजवावी लागते की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आम्ही हे करु, आम्ही ते करु आणि यालाच तर राजकारण म्हणतात. अनेकजण असे आहेत की वाटेल ते सांगतात. आम्ही तुमच्यासाठी तारे तोडून आणू, आम्ही तुमच्यासाठी चंद्रावर उड्डाणपूल बांधून देऊ. या काही गोष्टी होण्यातल्या नसतात त्या सांगतात आणि लोक फसतात आणि मतं देऊन मोकळी होतात. मग पाच वर्षे काही बोलायचं नाही. मग पुढच्या वर्षी अहो तुम्ही बोलला होतात की, तुमच्यासाठी तारे तोडून आणू, मग लोकं बऱ्याचदा त्यांनाच तारे दाखवतात. तर अशा गोष्टी आपण कधी केल्या नाहीत आणि करणारही नाहीत’, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटा काढलाय.